सैन्य भरतीसाठी गेलेल्या युवकाचे अपघाती निधन
हुक्केरी तालुक्यातील करजगा गावचे कट्टर शिवभक्त प्रमोद अरूण नांगरे यांचे तमिळनाडू येथे झालेल्या अपघातात निधन झाले. ते २४ वर्षांचे होते.
प्रमोद नांगरे हा भारतिय सैन्य दलात भरतीच्या निवड चाचणीसाठी तमिळनाडूला गेला होता. जेवणासाठी पायी जाताना त्याला भरधाव दुचाकीने त्याला जोराची धडक दिली. त्यामुळे उडून पडून तो गंभीर जखमी झाला. इस्पितळात उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. त्याच्या मागे आईवडील आणि २ बहिणी असा परिवार आहे. लाघवी आणि कष्टाळू स्वभावाचा प्रमोद सगळ्यांच्या मदतीला धावून जात असे.
प्रमोदच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याच्या अकाली निधनामुळे करजगा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे पार्थिव शरीर तमिळनाडूहून आज दुपारपर्यंत करजगा येथे आणण्यात येणार असून त्यानंतर अंत्यविधी करण्यात येणार आहे.