भाजप जाती -धर्मांत फूट पाडून मते मागतात: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
भाजप विकासकामांवर मते मागण्याऐवजी जाती-धर्मांत फूट पाडून मते मागत आहे. मोठी विकासकामे करणारे डबल इंजिन सरकार असा दावा करणारा भाजप अप्रत्यक्षपणे आपले अपयश कबूल करत आहे .अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस भवन मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी ते म्हणाले की काँग्रेसने या निवडणुकीसाठी सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचे सांगून त्याचे स्वागत केले. प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबप्रमुख महिलेला दरमहा 2 हजार रुपये, अन्नभाग्य योजनेत बीपीएल कुटुंबांना दरमहा 10 किलो रेशन, युवानिधी योजनेत बेरोजगार पदवीधारकांना दरमहा 3 हजार आणि डिप्लोमाधारक बेरोजगार तरुणांना दरमहा 1500 रुपये भत्ता आणि महिलांना मोफत बसप्रवास या सर्व योजना पाहिल्या तर एखाद्या सामान्य व्यक्तीला, कुटुंबाला रोज लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. ते पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.
त्यांनंतर ते म्हणाले काँग्रेसची कर्नाटकात कोणाशीही युती नाही. त्यामुळे येथे प्रत्येक पक्षाला आपली भूमिका, मते मांडण्याचा हक्क आहे. काँग्रेसच्या आश्वासनांना रेवड्या म्हणून हिणवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी, 2014 मध्ये काळा पैसे जमा करून देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे, बेरोजगारांना वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आणि पेट्रोल-डिझेल-गॅस स्वस्तात देण्यासह अनेक आश्वासनांची खैरात केली होती. त्या रेवड्या नाहीत तर काय होते असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी व काँग्रेस नेते उपस्थित होते.