श्री हनुमान जयंती निमित्त हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बलप्राप्तीसाठी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात ठीक ठिकाणी गदा पूजन !
बेळगाव : हिंदूंचा इतिहास शौर्य आणि पराक्रमाचा आहे; परंतु पुष्कळ वर्षे सशस्त्र क्रांती करून मिळविलेल्या स्वातंत्र्यानंतर ‘ दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल…’ अशी चुकीची माहिती देऊन हिंदूंच्या भावी पिढीला शौर्यापासून वंचित ठेवले. गेल्या ७५ वर्षात हिंदूंचे शौर्य जागृत होईल, असा कोणताही कार्यक्रम झालेला पाहिला नाही. या दृष्टीने हिंदूंमध्ये शौर्य जागृती व्हावी आणि प्रभु श्रीरामाच्या कृपेने रामराज्य म्हणजे हिंदुराष्ट्र स्थापनेला बळ प्राप्त व्हावे; म्हणून श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ समविचारी संघटनांच्या वतीने संपूर्ण देशात ८०० ठिकाणी तर बेळगाव जिल्ह्यात १९ ठिकाणी ६८५ लोकांच्या उपस्थितीत ‘गदा पूजन’ करण्यात आले.
शंखनादाने पूजेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदा पूजन’विधी, श्री हनुमानाची आरती, स्तोत्र, ‘श्रीहनुमते नम: ।’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत ?’ या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा’ करण्यात आली.
हिंदूंच्या प्रत्येक देवतेचे रूप पाहिले असता देवतेचा एक हात आशीर्वाद देणारा, तर इतर सर्व हातांमध्ये विविध प्रकारची अस्त्रे-शस्त्रे आहेत. त्या दृष्टीने देवतांच्या शस्त्रांचे पूजन केल्यास हिंदूंमध्ये शौर्य जागृत होण्यास साहाय्य होईल. या वर्षी श्रीराम नवमीच्या मिरवणुकांवर अनेक राज्यांत भीषण आक्रमणे झाली. हिंदूंना लक्ष्य करून हिंदूंचे खच्चीकरण करण्यात आले. या गदा पूजनाच्या माध्यमातून हिंदूंना पुन्हा एकदा बळ मिळावे,हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे यासाठी सण-उत्सवांच्या वेळी प्रतिकात्मक शस्त्रपूजन केले पाहिजे असा या कार्यक्रमामागील उद्देश होता.
समर्थ रामदासस्वमींनी स्थापन केलेल्या ११ मारुतींच्या देवस्थानात देखील गदा पूजन करण्यात आले. त्यासह बागलकोट, धारवाड, शिवमोग्गा, उडुपी, दक्षिण कन्नड, मैसुरू, तुमकुर, बेंगळुर आणि बेळगाव; महाराष्ट्र, उत्तरप्रदेशातील मथुरा यांसह देहली, राजस्थान येथे देखील सामूहिक ‘गदा पूजन’ उत्साहात पार पडले. या कार्यक्रमांत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.