सांबरा येथे रिंगण सोहळा उत्साहात
टाळ-मृदंगाचा गजर आणि हरीनामाच्या अखंड जयघोषात सांबरा येथे आयोजित उभे आणि गोल रिंगण भक्तिमय वातावरणात पार पडले. हा रिंगण सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी वारकरी आणि भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. रिंगण परिसर रांगोळी, भगव्या पताका, भगव्या ध्वजानी सजावण्यात आल्याने गावात पंढरपूर वारीची अनुभूती आली.
श्री ज्ञानेश्वरी पारायणाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त माऊलींच्या अश्वाचे उभे आणि गोल रिंगण आयोजित करण्यात आले होते. मारुती गल्ली आणि लक्ष्मी गल्लीत उभे रिंगण पार पडले. तर क्रिकेट मैदानावर गोल रिंगण सोहळा रंगला. रिंगण सोहळ्यात अनेक गावाच्या दिंड्या सहभागी झाल्या होत्या.
दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सुमारे दहा हजाराहून अधिक भाविकांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवज्योती मंडळ, ग्रामस्थ आणि वारकरी यांनी परिश्रम घेतले.