श्रीधर माळगी याची जागतिक स्पर्धेसाठी निवड
स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लब बेळगावचा सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दिव्यांग जलतरणपटू श्रीधर निंगाप्पा माळगी याची शेफिल्ड युनायटेड किंगडम येथे येत्या 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत होणाऱ्या सिटी पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज -2023 या जागतिक जलतरण स्पर्धेसाठी 15 जणांच्या भारतीय चमूत निवड झाली आहे.
सदर जागतिक स्पर्धेच्या एस8 गटातील 50 व 100 मी. फ्रीस्टाईल, 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक आणि 200 मी. इंडिव्हिज्युअल मिडले शर्यतीमध्ये श्रीधर माळगी भाग घेणार आहे. शहरातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव आणि बेंगलोर येथील झी स्विमिंग अकॅडमी या ठिकाणी श्रीधर पोहण्याचे प्रशिक्षण घेत सराव करतो. त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अर्जुन पुरस्कार विजेते ऑलिंपियन शरथ गायकवाड, अक्षय शेरेगार आणि अजिंक्य मेंडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये श्रीधर माळगी यांनी आतापर्यंत सहा वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या खेरीज आजतागायत त्याने 8 आंतरराष्ट्रीय पदके आणि 40 हून अधिक राष्ट्रीय पदके पटकाविली आहेत. चंदन टीव्ही वाहिनीवर अलीकडेच त्याची खास मुलाखत ही प्रसिद्ध झाली आहे.
आता युनायटेड किंगडम येथील जागतिक जलतरण स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल केलेली सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, रो. अविनाश पोतदार, जयभारत फाउंडेशनचे जयंत हुंबरवाडी, माणिक कापडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आणि इतरांनी श्रीधर माळगी याचे अभिनंदन केले असून त्याला सुयश चिंतले आहे.