शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा 16 मार्चला
बेळगावात उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे उदघाटन दि.१६ मार्च रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार आहे .
शिवसृष्टी हे बेळगावचे आकर्षण ठरणार असून याच्या निर्माणासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च आला आहे.आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने शिवसृष्टी चे निर्माण करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण प्रसंग येथे साकारण्यात आले आहेत.शिवजन्म सोहळा,राज्याभिषेक, अफजलवध हे प्रसंग तर विशेष लक्ष वेधून घेतात.शिवसृष्टी ला भेट देणाऱ्या व्यक्तींना लाईट अँड साऊंड शो देखील सायंकाळी पाहता येणार आहे.या लाईट आणि साऊंड शो द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जाणार आहे.चाळीस मिनिटांचा हा लाईट अँड साऊंड शो असून तो कन्नड आणि मराठी मध्ये असणार आहे.दिवसभर लोक शिवसृष्टीला भेट देऊ शकतात.
त्यांना ब्ल्यू टूथ आणि हेड फोनच्या माध्यमातून छत्रपतींचा इतिहास समजून घेता येणार आहे .शिवसृष्टीची इमारत किल्ल्या प्रमाणे असून बुरुजावर मावळे सज्ज असल्याचे पाहायला मिळतात.शिवसृष्टी चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे वॉटर स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र तसेच निवडक प्रसंग दाखवले जाणार आहेत.वॉटर स्क्रीन वरचा हा भारतातील पहिला उपक्रम आहे अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली.
.