वीर पत्नीच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन
जय हिंद फाउंडेशन च्या वतीने शहापूर येथील विश्वकर्मा मंगल कार्यालयांमध्ये एसपीएम रोड शहापूर बेळगाव येथे वीर पत्नीच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद फाउंडेशनचे कोल्हापूर विभाग प्रमुख राष्ट्रीय संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे भौतिकशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ केशव राजपुरे, सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव माजी महापौर सरिता पाटील माजी उपमहापौर रेणू किल्लेकर जय हिंद फाउंडेशनच्या राष्ट्रीय संचालिका मनीषा अरगुणे, सातारा जिल्हा महिला प्रमुख उर्मिला ताई कदम तसेच महिला संपर्कप्रमुख बेळगाव वीर पत्नी सुनीता पाटील उपस्थित होत्या.
यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालणं आणि सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना किरण जाधव यांनी वीर पत्नींना मार्गदर्शन केले. आणि म्हणाले की महिला दिन हा फक्त महिला दिनापुरता मर्यादित नसून महिला दिन हा दररोज साजरा होत असतो प्रत्येक दिवसाची सुरुवात ही महिलांपासून होत असते आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला उभ्या आहेत.
ज्याप्रमाणे महिला पुरुषाला साथ देतात त्याचप्रमाणे आपण पुरुषवर्गाने सुद्धा महिलांना पाठिंबा दिला पाहिजे आपली आई पत्नी बहीण त्याचबरोबर समाजातील सर्व भगिनींना पुढे येण्यास मदत केली पाहिजे असे प्रतिपादन केले.
त्यानंतर डॉ केशव राजपुरे यांनी जय हिंद फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली आणि जय हिंद फाउंडेशन शहीद सैनिक आणि त्यांच्या कुटुंब कल्याणासाठी सामाजिक कार्य करणारी एकमेव संस्था असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी या शाखेचा बेळगाव मध्ये आज पासून शुभारंभ झाला असल्याचे यावेळी सांगितले.
त्यानंतर उपमहापौर आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी जय हिंद फाउंडेशन ही संस्था अशी जवानांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम करते आहे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ती तत्पर आहे. संस्थेने अशाच प्रकारे जवानांच्या कुटुंबियांना एका छताखाली आणून त्याच्या समस्या सोडाव्यात आणि त्यांना मदतीचा हात मिळवून द्यावा त्याचप्रमाणे समाजामध्ये त्यांना योग्य सन्मान मिळवून देत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.
त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व वीर पत्नींचा आणि त्यांच्या आईचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व वीर पत्नींना हळदी कुंकू देऊन जय हिंद फाउंडेशन जळगाव शाखेची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता नाईक -देसाई यांनी केले. तर प्रास्ताविक सुनिता पाटील यांनी केले. तर आभार रेखा खादरवाडकर यांनी मानले यावेळी या कार्यक्रमाला वीर पत्नी माता त्याचबरोबर जय हिंद फाउंडेशन कोल्हापूर आणि सातारा चे सदस्य उपस्थित होते.