*चव्हाट गल्ली मराठी शाळेत मराठी भाषा दिन , स्नेहसंमेलन व विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न*
दिनांक 28 फेब्रुवारी 2023 सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नं.5 चव्हाट गल्ली बेळगाव येथे *मराठी भाषा दिन ,स्नेहसंमेलन व विज्ञान दिन* असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष *श्री दीपक किल्लेकर* व प्रमुख पाहुणे म्हणुन दैनिक पुढारी बेळगाव आवृत्तीचे प्रमुख *श्री गोपाळ गावडा* हे उपस्थीत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शारदा मातेचे फोटो पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.तदनंतर श्री हरीकृष्णा नाथबुवा यांनी प्रास्ताविक केले. पुष्पगुच्छ देवून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कुमारी संस्कृति लोंढे या विद्यार्थीनीने मराठी भाषेचा गोडवा आपल्या मनोगतामधून व्यक्त केला.प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना श्री गोपाळ गावडा यांनी मराठी भाषा गौरव दिनाची पार्श्वभूमी सांगून मराठी भाषेत सध्या सुरू असलेल्या प्रयोगांचे मंथन केले. तसेच विज्ञान दिनाच्या निमित्ताने सर सी.व्ही.रामन यांचे योगदान याविषयांवर आपले विचार मांडले. मुलांच्या मध्ये प्रश्न विचारण्याचे कौशल्य विकसित करण्याचे आवाहन सर्वाना केले कारण प्रश्नातुनच मुलांचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांनतर मुख्यदयापक श्री पी.के.मुचंडीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर कार्यक्रमाचा आकर्षण बिंदु असलेला माजी विद्यार्थी संघातर्फे यावर्षीपासून देण्यात येणारा श्री दीपक किल्लेकर पुरस्कृत आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला. श्री दीपक किल्लेकर पुरस्कृत आदर्श विद्यार्थी म्हणुन इयत्ता सातवीचा विद्यार्थी रूद्र नितीन भोसले व आदर्श विद्यार्थिनी म्हणुन इयत्ता सातवीची विद्यार्थिनी स्नेहा सदाशिव परीट यांचा मानाची ढाल व रोख रक्कम देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.तसेच आदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी मानांकन मिळालेल्या इतर 4 विद्यार्थी व 4 विद्यार्थिनीना देखील रोख रक्कम देवून गौरविले. चव्हाट गल्ली केंद्रप्रमुख श्री राजू बेळगुंदकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चटया भेट म्हणुन दिल्या. तसेच सातवीच्या विद्यार्थ्यांनी देखील शाळेसाठी भेटवस्तू दिली. गेले दिड महिना शाळेमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थी शिक्षकाना यावेळी भेटवस्तू देवून निरोप देण्यात आला. तद्नंतर मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
अध्यक्षीय भाषणातून दीपक किल्लेकर यांनी मराठी भाषेचा गोडवा गायिला तसेच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सादर झालेल्या नृत्यांचे भरभरुन कौतुक करित केवळ नृत्यावर भर न देता एकांकिका, नाटके असे विविध प्रकार विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री अशोक अष्टेकर, उपाध्यक्षा श्रीमती हुदलीकर, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी श्री रवी नाईक,श्री श्रीकांत कडोलकर तसेच सर्व शिक्षक वृंद,पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी.ए.माळी सर यांनी तर आभार श्री व्ही.व्ही.पाटील सर यांनी मानले.