टिळकवाडी परिसरात शिवसन्मान पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसन्मान पदयात्रेला आज शनिवारी सकाळी टिळकवाडी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर पदयात्रेचे सर्वत्र उत्साही स्वागत करून पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
शिवछत्रपतींच्या सन्मानार्थ तसेच मराठी अस्मिता, भाषा आणि संस्कृतीसह मराठी माणसांच्या एकजुटीचे संवर्धन करण्यासाठी येळ्ळूर राजहंस गडावरून दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांनी सुरू केलेल्या शिवसन्मान पदयात्रेचे आज शनिवारी सकाळी भवानीनगर येथून टिळकवाडी आगमन झाले. अग्रभागी भगवा ध्वज हाती घेतलेला अश्वस्वार असलेली ही पदयात्रा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. सावरकर रोड टिळकवाडी येथे मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी आपल्या निवासस्थानासमोर या पदयात्रेचे सहर्ष स्वागत केले. सर्वप्रथम दळवी यांनी पुष्पहार घालून पूजन करण्यात द्वारे भगव्या ध्वजाला नमन केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे वगैरे घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. ध्वजपूजनानंतर दीपक दळवी यांनी पदयात्रेचे नेतृत्व करणारे रमाकांत कोंडुसकर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच त्यांना शुभाशीर्वाद देऊन सुयश चिंतले. यावेळी दळवी कुटुंबातील सुहासिनींनी ध्वज पूजन करून कोंडुसकर यांचे औक्षण केले. याप्रसंगी पदयात्रेतील कार्यकर्त्यांसह सावरकर रोड परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सावरकर रोड येथून शिवसन्मान पदयात्रा टिळकवाडी परिसरात फिरवून शिवाजी कॉलनी मार्गे नानावाडीकडे रवाना झाली. ही पदयात्रा आज टिळकवाडी व नानावाडी परिसरासह अनगोळ, भाग्यनगर आणि वडगाव भागात फिरून जनजागृती करणार आहे. छ. शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ तसेच मराठी भाषा आणि भगव्या ध्वजाला सन्मान मिळाला पाहिजे, रेल्वे स्थानकासमोर छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त विकास झाला पाहिजे, गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत आदी विविध मागण्यांसाठी सदर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.