या कारणाकरिता शेतकऱ्यांनी शेतात चारवली बकरी
कोबीचा दर प्रति किलो एक रुपये इतका घसरल्याने शेतकऱ्यांनी कोबीच्या शेतात बकरी चरायला सोडली.
बेळगाव जवळील जाफरवाडी येथील एका शेतकऱ्याने कोबीचा दर किलोला एक रुपये इतका कमी झाल्याने शेतात बकरी चरायला सोडली.अन्य भाज्यांचे दर वगळता कोबीचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या समोर शेतातील कोबीचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.एक रुपये किलोला कोबीचा दर झाल्याने त्यातून मजुरी आणि वाहतूक खर्च देखील निघत नाही.
त्यामुळे उत्पादन आणि खर्च यांचा ताळमेळ बसेना झाला आहे.कोबी उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे .शेणखत,रासायनिक खत,ट्रॅक्टर भाडे आणि मजुरीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे.पण कोबीचा भाव गडगडल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
बेळगाव तालुक्यातील जाफरवाडी, देवगिरी, काकती, होनगा, गौंडवाड, अगसगा , कंग्राळी आदी भागात भाजीपाला आणि कोबीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.दर पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबी असलेल्या शेतात ट्रॅक्टर फिरवला आहे.