लक्ष समोर ठेवूनच कार्य करा- प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात स्नातकोत्तर एम.काँम. आणि एम. एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी पदी नँक समन्वय अधिकारी प्रा. आर.एम. तेली उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुष्मिता देशपांडे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. प्रमुख अतिथी पदावरून बोलताना प्रा. आर. एम. तेली म्हणाले की, विद्यार्थी जीवनात पाठ्यपुस्तकाच्या अतिरिक्त सामान्य ज्ञान सुद्धा अति आवश्यक आहे. शिकत असतानाच विद्यार्थी आपल्या व्यक्तीत्वाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
त्यानंतर अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर यांनी विद्यार्थ्यांना उपदेशात्मक शब्दातून बोलताना म्हणाले की, आजचा युग स्पर्धात्मक असल्यामुळे विद्यार्थी आपल्या भावी आयुष्याला घडवण्यासाठी पूर्व योजना आखून काय बनणे योग्य आहे याचे लक्ष डोळ्यासमोर ठेवूनच त्याची पूर्ती करण्यासाठी कष्ट घेणे आवश्यक आहे. यावेळी प्रा. तुकाराम कुलम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतमी कडोलकर यांनी केले तर शेवटी भारता चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले .