श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा मुहूर्तमेढ
बसवन कुडची (ता. जि. बेळगाव) येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे गावातील वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ व ग्रामस्थ पंच कमिटीतर्फे येत्या फेब्रुवारी महिन्यात आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा मुहूर्तमेढ कार्यक्रम आज बुधवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला
बसवन कुडची येथे आयोजित आजच्या या मुहूर्तमेढ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते व समाजसेवक परशराम इराप्पा बेडका उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक बसवराज मोदगेकर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ज्योतिबा जैनोजी, कलाप्पा मुतगेकर, नामदेव जैनोजी, जोतिबा मुतगेकर, राजू बाबजी परसराम पाटणकर, अनिल कोळुचे, सुरेश मुतगेकर, रमेश जोडगुंडे, नामदेव मुतगेकर, डॉ. एम. बी. हकाणाचे, पांडुरंग एकणेकर, वसंत तारीहाळकर आदींसह ग्रामस्थ पंच, मंदिर ट्रस्ट व गाव सुधारणा कमिटीचे सर्व सदस्य, भजनी मंडळाच्या सदस्यांसह गावकरी उपस्थित होते.
श्री विठ्ठल रूखमाई मंदिर, बसवन कुडची येथे येत्या शुक्रवार दि. 3 ते रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023 या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत दररोज पहाटे 4:30 ते 6 वाजेपर्यंत काकड आरती व अभिषेक, सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत ध्वजवंदन, सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत श्री ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गाथा भजन, सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत प्रवचन व नामजप आणि रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत कीर्तन निरूपण, असे कार्यक्रम होणार आहेत. पारायण सोहळ्याची सांगता रविवारी 5 फेब्रुवारी रोजी दुपारी महाप्रसादाने होणार आहे. तरी भाविकांनी या सोहळ्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.