सहा एकर ऊस जळून खाक
कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या माने मळ्यातील सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली.
सहा एकरातील शेतीमध्ये अचानक पेट घेतल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील अग्निशामक दलाने आग विझवण्यात यश मिळवले.
राष्ट्रीय महामार्ग लगतच असणाऱ्या उसाच्या शेतीला आग लागल्याने जवळच टोलनाकालगत अनेक व्यावसायिकांची दुकाने व हॉटेल आहेत. ऊस शेतीतील आग दुकानाच्या बाजूने येत असताना शेतकरी व युवकांनी ताबडतोब येऊन ऊस तोडून ऊस शेतीचे दोन भाग केल्याने टोलनाक्याकडे येणारी आग विझली. यामुळे पुढील अनर्थ टाळला. अन्यथा या ठिकाणी व्यावसायिकांचेही लाखो रुपयाचे नुकसान झाले असते.
टोल नाक्याजवळ असणाऱ्या माने मळ्यालगतच अनेकांचे जनावरांचे गोठे आहेत. उसाच्या शेतीला आग लागून गोठ्याच्याकडे आग येत असल्याने शेतकऱ्यांनी जनावरे सोडून दिली तर गोठ्याकडे येणारी आग ताबडतोब विझवली.