खासदार धैर्यशील माने यांना उद्या बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी
सीमा प्रश्नाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना दि.१९ डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली असल्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे. दि.१९ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी खासदार धैर्यशील माने येणार होते.महा मेळाव्यात सहभागी होऊन प्रक्षोभक भाषण करून जनतेच्या भावना भडकण्याची शक्यता आहे.त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो.सार्वजनिक आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान होण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.सी आर पी सी १९७३ कलम १४४(३) अन्वये बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास खासदार धैर्यशील माने यांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे.