संमेद शिखरजी तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यामुळे त्या विरोधात जैन धर्मियांनी छेडले आंदोलन
जैन धर्मीयांच्य चे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झारखंड राज्यातील संमेद शिखरजी तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले असून त्याला विरोध दर्शवण्यासाठी हजारो जैन धर्मियांनी बेळगावात मोर्चा काढला.
छत्रपती धर्मवीर संभाजी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला.हातात ध्वज घेऊन आणि फलक घेऊन जैन बांधव मोर्चात सहभागी झाले होते. शिखरजी बचाव अशा घोषणा मोर्चात सहभागी झालेल्यानी दिल्या.जिल्हाधिकाऱ्यांना जैन धर्मीयांनी निवेदन देऊन झारखंड मधील संमेद शिखरजी तीर्थक्षेत्राला देण्यात आलेला पर्यटन स्थळाचा दर्जा रद्द करावा आणि तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखावे अशी मागणी केली.
जैन धर्मीयात संमेद शिखरजी हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असून आयुष्यात एकदा तरी तेथे जाण्याची प्रत्येक जैन धर्मियांची इच्छा असते.संमेद शिखरजी पर्यटन स्थळ झाले तर तेथे मांसाहारी हॉटेल, बार सुरू होऊन तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होणार आहे.अशा तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा देणे चुकीचे असून झारखंड सरकारने जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी बेळगाव जिल्हा जैन समाजाने जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.मोर्चात माजी आमदार संजय पाटील, हेमेंद्र पोरवाल यांच्यासह हजारो जैन धर्मीय सहभागी झाले होते.