आर्मी पब्लिक स्कूल, मराठा एलआयआरसी येथे एनसीसी युनिटचे भव्य उद्घाटन
बेळगाव, 19 सप्टेंबर 2025 :
आर्मी पब्लिक स्कूल, द मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एलआयआरसी), बेळगाव येथे 168/26 कर्नाटक बटालियन एनसीसी युनिटची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटचे उद्घाटन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी (कमांडंट एमएलआयआरसी व चेअरमन एपीएस) यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास कर्नल मोहन नाईक (ग्रुप कमांडर, एनसीसी ग्रुप मुख्यालय, बेळगाव), कर्नल सुनील दागर (कमांडिंग ऑफिसर, 26 कर्नाटक बटालियन एनसीसी) व ले.कर्नल अरुण मॅथ्यू (स्टाफ ऑफिसर, एपीएस) उपस्थित होते.
पहिल्याच वर्षी 50 विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने एनसीसीमध्ये प्रवेश घेतला असून, पुढील काळात अधिक विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिस्त, एकात्मता व राष्ट्रसेवेचा संदेश दिला.
ब्रिगेडियर मुखर्जी यांनी कॅडेट्सना शिस्त, समर्पण आणि राष्ट्रसेवा या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच एनसीसीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व व्यक्तिमत्व विकास घडवून ते समाज व राष्ट्रनिर्मितीत योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.
या उपक्रमामुळे आर्मी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना समाजकार्य, साहसी उपक्रम आणि नेतृत्व विकासासाठी नवे दालन खुले झाले आहे.