सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई
बेळगाव :
सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलीस विभागाने थेट इशारा दिला आहे. “प्रक्षोभक पोस्ट केल्यास थेट फौजदारी खटला दाखल केला जाईल,” असा सक्त इशारा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी दिला.
अलीकडेच गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद मिरवणुका शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्या. या काळात सर्व धर्मीय नागरिकांनी पोलीस यंत्रणेस सहकार्य केले. मात्र त्यानंतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
प्रक्षोभक पोस्ट्स रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे 15 कर्मचारी 24 तास विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
आयुक्त बोरसे म्हणाले की, “प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु कोणालाही भावना भडकवण्याचा किंवा समाजमन दूषित करण्याचा अधिकार नाही. अशा पोस्ट्स आढळताच संबंधितांना त्याच प्लॅटफॉर्मवर पोलिसांकडून नोटीस पाठवली जाईल. जर अशा पोस्टमुळे समाजात अशांतता निर्माण झाली, तर संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवला जाईल.”
नागरिकांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करून आयुक्तांनी स्पष्ट केले की, प्रक्षोभक मजकूर किंवा अभद्र भाषा अजिबात सहन केली जाणार नाही.