बेळगाव :
बेळगावकर भक्तांसाठी यंदाची नवरात्र विशेष ठरणार आहे. हिंदवाडी येथील सुभाष मार्केट परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिरात प्रथमच ‘चंडी होम’ या महत्त्वपूर्ण वैदिक विधीचे आयोजन करण्यात आले आहे. २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या नऊ दिवसांच्या कालावधीत श्रद्धा आणि भक्तिभावाने हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
पं. विनायक ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी १० वाजता संकल्प व गणपति पूजन, चंडी यज्ञ, बलिदान, १०८ वेळा मंत्रपठण आणि १०८ वेळा कुंकू अर्चना अशा पारंपरिक विधींनी नवरात्र महोत्सव रंगणार आहे.
मंदिर समितीने भक्तांसाठी काही नियमावली ठरवली आहे. यात पुरुषांनी धोतर-उपरणे किंवा उपवस्त्र परिधान करणे, महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणे, तसेच उपवासाकरता दूध, फळे आणि साबुदाणा खिचडी यांचा समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दररोजच्या कार्यक्रमात पूर्णाहुती, नैवेद्य आणि महाआरतीनंतर भक्तांना दैवी वातावरणाचा लाभ घेता येणार आहे. तसेच, मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास अडचण असणाऱ्यांसाठी ऑनलाईन सहभागाचीही सोय करण्यात आली आहे.
या उपक्रमाबाबत आयोजकांनी सांगितले की, “नवरात्र उत्सव हा देवीच्या दैवी कृपेचा अनुभव घेण्याचा काळ आहे. बेळगावात प्रथमच ‘चंडी होम’चे आयोजन करून भाविकांना अनोखा आध्यात्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.”