कंग्राळी बिके शाळेच्या माधुरी पाटील हिची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : कंग्राळी बिके येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थिनी कुमारी माधुरी गजानन पाटील हिरे हिने क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. तालुका पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत तिने 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर वैयक्तिक धावण्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला असून आता तिची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
माधुरीच्या या यशामुळे शाळा, कंग्राळी बिके गाव तसेच संपूर्ण बेळगाव ग्रामीण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या कामगिरीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन तसेच एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष, उपाध्यक्षा आणि सर्व सदस्यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.
माधुरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावकऱ्यांसह शिक्षक व पालकवर्गाकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.