सेंट्रल बस स्थानकातील सोनसाखळी चोरी प्रकरणी महिला आरोपी अटक
बेळगाव शहरातील सेंट्रल बस स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीस मार्केट पोलिसांनी गजाआड केले आहे.
दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी निपाणी तालुक्यातील श्रीमती ज्योती पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 30/2024, कलम 379 भा.दं.सं. अंतर्गत तपास सुरू करण्यात आला होता. या प्रकरणात बसस्थानक परिसरात झालेल्या सततच्या चोरींच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने तपास करत तामिळनाडूतील वेल्लूर जिल्ह्यातील तिरुपट्टूर येथील मोनिशा (वय 28) हिला बेळगावमध्ये अटक केली. तिच्या ताब्यातून ५१ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ₹५.६५ लाख किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईत पीआय महांतेश धामण्णवर, पीएसआय एच.एल. केरूर यांच्यासह नवीणकुमार ए.बी., बी.एल.एस. कडोलकर, आसीर जमादार, सुरेश एम. कांबळे, कार्तिक जी.एम., एम.बी. ओडेयार, मल्लिकार्जुन गुदगोप्प, तसेच तांत्रिक विभागातील रमेश अक्की व महादेव काशीद यांनी मोलाची भूमिका बजावली. पोलिस आयुक्तांनी संपूर्ण टीमच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे.
ही कारवाई झाल्यामुळे बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्यांवर मोठा धाक बसला आहे.