गणेश विसर्जनानंतर सावगाव तलावावर मराठा LIRC चा स्वच्छता अभियान
बेळगाव, ८ सप्टेंबर २०२५
पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ही केवळ समाजाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची आहे, याचा प्रत्यक्ष प्रत्यय सावगाव तलाव परिसरात आला. गणेश विसर्जनानंतर तलावात साचलेल्या फुलांचा कचरा, प्लॅस्टिक व अन्य अवशेष हटवण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MLIRC), बेळगाव यांनी मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान राबवले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी (कमांडंट, मराठा LIRC) यांनी केले तर प्रत्यक्ष नेतृत्व कॅप्टन जिनीश के. यांनी केले. दोन जेसीओ आणि सुमारे १०० जवानांनी या मोहिमेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे सावगाव ग्रामपंचायतीचे सदस्य, कुटुंबातील महिला आणि लहान मुलेही या अभियानात सहभागी झाली. लष्कर आणि स्थानिक नागरिकांनी खांद्याला खांदा लावून काम केल्याने तलाव परिसर पुन्हा स्वच्छ व आकर्षक झाला.
या उपक्रमातून सैनिकांची केवळ सीमेवरील जबाबदारी नव्हे, तर समाजाप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित झाली. पर्यावरण संवर्धन व नागरिकांची जबाबदारी याबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचवण्यात हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.
स्वच्छ, हरित आणि निरोगी भारत घडविण्याच्या दिशेने मराठा LIRC ने दाखवलेले हे नेतृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.