मराठा समाजाचा बेळगावात आनंदोत्सव
जरांगे यांच्या आंदोलनाला यश
बेळगाव:
मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व असलेल्या मनोज जरांगे – पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी 29 ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला २ सप्टेंबर रोजी यश मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले आहे. त्यामुळे बुधवारी बेळगाव मधील धर्मवीर संभाजी चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांकडून धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, मराठा समाजाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मराठा समाज बेळगावचे नेते आणि माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रकाश मरगाळे, रमाकांतदादा कोंडुसकर, नगरसेवक रवी साळुंखे यांनी आपले विचार व्यक्त केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांचे बेळगाव मधील सकल मराठा समाजातर्फे पुन्हा एकदा अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, मोहन कांबळे यांच्यासह अन्य दलित बांधव उपस्थित होते.