भव्य जलतरण स्पर्धा : मराठा युवक संघाच्या वतीने २० वी आंतरशालेय व आंतरविद्यापीठ स्पर्धा १३ व १४ सप्टेंबरला
बेळगाव :
मराठा युवक संघाच्या वतीने आयोजित होणाऱ्या वार्षिक जलतरण स्पर्धांना यंदा २० वर्षे पूर्ण होत असून, या विशेष पर्वानिमित्त भव्य आंतरशालेय व आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ व १४ सप्टेंबर रोजी गोवावेस येथील महापालिकेच्या जलतरण तलावात ही स्पर्धा रंगणार आहे.
कै. एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित या जलतरण स्पर्धेसाठी संघटनेच्या अलीकडील बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी हा प्रस्ताव मांडला असून, सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिली.
या बैठकीत शिवाजीराव हंगीरगेकर, मारुती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल, नारायण किटवाडकर, सुहास किल्लेकर, शेखर हांडे यांसह जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार उपस्थित होते. संघाचे सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल यांनी सांगितले की, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक नामांकित जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच बेळगाव शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयातील जलतरणपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
विशेष माहितीसाठी प्रशिक्षक विश्वास पवार यांच्याशी गोवावेस येथील महापालिका जलतरण तलावावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे