बेळगावात लष्करी–नागरी एकात्मतेसाठी महत्त्वपूर्ण बैठक
बेळगाव : मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MARATHA LIRC) येथे लष्करी-नागरी एकात्मतेसाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षा यंत्रणांमध्ये परस्पर समन्वय, संयुक्त प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन व अंतर्गत सुरक्षेसाठी सज्जता वाढवण्यावर भर देण्यात आला.
बैठकीचे अध्यक्षस्थान कमांडंट व स्टेशन कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी भूषवले. यावेळी एअरमेन ट्रेनिंग स्कूल, ITBP, CRPF कोब्रा युनिट, काउंटर इन्सर्जन्सी जंगल वॉरफेअर स्कूल (CIJW), NDRF तसेच इंडियन रिझर्व्ह बटालियन-कर्नाटकचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पायाभूत सुविधांचा सामायिक वापर, उत्कृष्ट पद्धतींची देवाणघेवाण आणि सर्व सुरक्षा दलांमधील कार्यक्षम समन्वयावर विशेष चर्चा झाली. आपत्ती व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षेसाठी जलद प्रतिसादक्षमता वाढवणे ही या बैठकीची प्रमुख दिशा ठरली.
या बैठकीत ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी (कमांडंट, मराठा LIRC), कर्नल व्ही.के.बी. पाटील (डेप्युटी कमांडंट व प्रशिक्षण बटालियन कमांडर), कर्नल छत्रपती बोरुडे (प्रशिक्षण अधिकारी), मेजर अभिषेक कश्यप, ब्रिगेडियर संदीप झुंजा (DIG, CIJW-ITBP), राजकमल मलिक (डेप्युटी कमांडंट, 44 ITBP), स्क्वॉड्रन लीडर रशीद शेख (एअरमेन ट्रेनिंग स्कूल), अशोक नेगी (2IC, CIJW-ITBP), सहाय्यक कमांडंट एन.पी. यादव (24 KSRP), कर्नल एच.एस. कोहली (मुख्यालय, जंगल वॉरफेअर विंग), सहाय्यक कमांडंट जितेंद्र कुमार यादव (CRPF कोब्रा युनिट) आणि इन्स्पेक्टर बबलू विश्वास (NDRF) यांची उपस्थिती होती.
या चर्चेमुळे लष्करी दल आणि नागरी सुरक्षायंत्रणांमध्ये अधिक सक्षम व सुसंवादात्मक सहकार्य घडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.