गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी
बेळगाव:
बुधवारी विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी येथील बाजारपेठेमध्ये नागरिकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. सोमवारी येथील बाजारपेठेमध्ये नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.
पूजा साहित्य, सजावटीचे साहित्य, फळे , फुले, कपडे यांसारख्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेमध्ये सोमवारी गर्दी केली होती. शहरातील खडे बाजार , गणपत गल्ली , मारुती गल्ली , मार्केट, नरगुंदकर भावे चौक , कडोलकर गल्ली, किर्लोस्कर रोड या भागांमधील दुकानात खरेदीसाठी गर्दी झाली होती.
सजावटीच्या साहित्याच्या मागणीला आणि पूजेच्या साहित्य च्या मागणीला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. विविध प्रकारचे हार तसेच सजावटीचे साहित्य वेगवेगळ्या दरामध्ये आणि वेगवेगळ्या आकारांमध्ये येथील बाजारपेठेमध्ये उपलब्ध असल्याचे दिसून आले.
गणरायाचे बुधवारी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असल्याचे दिसत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ आकर्षकपणे सजली असून दुकानदार या संधीचा पुरेपूर फायदा घेत असल्याचे दिसत आहे.