“चन्नेवाडीतील शतकानुशतकांचा वटवृक्ष कोसळला; गावकऱ्यांच्या आठवणींचा ठेवा पुसला”
खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील कलमेश्वर मंदिर परिसरातील सुमारे चारशे ते पाचशे वर्षे जुना वटवृक्ष अखेर पावसाच्या जोरदार वाऱ्याला न जुमानता मुळासकट कोसळला. गावकऱ्यांतेसाठी हा फक्त वटवृक्ष नव्हता, तर त्यांच्या लहानपणाच्या आठवणी, श्रद्धा आणि निवांत क्षणांffxचा आधार होता.
हा वटवृक्ष मंदिरालगत असल्याने त्याच्या पारंब्यांवर झोकाळत अनेकांचे बालपण रमले होते. मंदिरात होणारे कार्यक्रम, महाप्रसाद, गावातील सण-समारंभ हे सगळे याच झाडाच्या सावलीत घडत असत. गावातील गुराखी जनावरांना चारताना उन्हापावसापासून आसरा घेण्यासाठी याच वटवृक्षाखाली विसावत. फक्त चन्नेवाडीच नाही, तर नंदगड, कसबा नंदगड आणि महामार्गावरून जाणारे प्रवासीही येथे येऊन वटवृक्षाखाली काही क्षण निवांत घालवत असत.
गावातील सुवासिनींच्या श्रद्धेचा प्रतीक मानला जाणारा हा वृक्ष पूर्वी महाराष्ट्र एकीकरणाच्या सभेत मान्यवरांच्या भाषणाचाही साक्षीदार ठरला होता. त्यामुळे वटवृक्ष कोसळल्याने गावकऱ्यांच्या भावना द्रवून गेल्या आहेत.
इतिहासाचा साक्षीदार असलेला हा वटवृक्ष आता नामशेष झाला असला तरी गावातील महिलांनी त्याच ठिकाणी पुन्हा वटवृक्ष रोपण करून ही परंपरा पुढे नेण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय मंदिरालगत श्रद्धाळूंना आसरा मिळावा म्हणून तात्पुरते पत्र्याचे शेड उभारले जाणार आहे.