सत्यमेव जयते!
गौंडवाड खून प्रकरणातील
पाच आरोपींना जन्मठेप
बेळगाव:
गौंडवाड, तालुका बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांच्या खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप तर अन्य ४ आरोपींना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शनिवारी या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन.के. गंगाधर यांनी हा निकाल दिला.
भैरवनाथ मंदिराच्या जागेवरून झालेल्या वादामधून सदर संशयित आरोपीनी सामाजिक कार्यकर्ते सतीश राजेंद्र पाटील यांचा तीन वर्षांपूर्वी भोसकून खून केला होता. याप्रकरणी दहा जणांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यापैकी पाच आरोपींना शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे:- आनंद रामा कुटे (वय 55), अर्णव आनंद कुटे (वय 32), जायाप्पा भैरू निलजकर (वय 50), महांतेश जायाप्पा निलजकर (वय 35), शशिकला आनंद कुटे (वय 50) अशी आहेत. या आरोपींवर दाखल करण्यात आलेला पुन्हा सिद्ध झाला होता. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पाच आरोपींना जन्मठेपे बरोबरच 13 लाखावर अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी दहा लाख रुपये मताच्या पत्नीला तर उर्वरित दंड मताच्या आईला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या खटल्यांमध्ये फिर्यादीच्या वतीने वकील शामसुंदर पत्तार आणि सरकारी पक्षातर्फे वकील माहूरकर यांनी काम पाहिले.
आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचे समजतात न्यायालयाबाहेर थांबलेल्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अखेर सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केलेल्या वकिलांचे आणि ग्रामस्थांचे मयत सतीश पाटील यांच्या पत्नीने आभार मानले. याप्रकरणी मयत सतीश पाटील यांच्या पत्नीची साक्ष महत्वपूर्ण ठरली आहे.