श्रावणाचा अखेरचा शनिवार; शनीदेवाच्या मंदिरात भाविकांची हजारोंची गर्दी
बेळगाव :
श्रावण महिन्याचा अखेरचा शनिवार असल्याने बेळगावच्या पाटील गल्लीतील श्री शनेश्वर मंदिरात शनिवारी सकाळपासूनच भक्तांचा मोठा ओघ पाहायला मिळाला. शनीदेवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
भाविकांनी शनीदेवाला तिळाचा दिवा अर्पण करून विशेष पूजाविधी केला. यावेळी आरोग्य, सुख-समृद्धी आणि मनोकामनांच्या पूर्ततेसाठी भक्तांनी प्रार्थना केली. मंदिर प्रशासनाने सुरळीत दर्शनासाठी काटेकोर व्यवस्था केली असल्याने भाविकांना कोणताही अडथळा आला नाही.
श्रावण महिन्याभरात दर शनिवारी भाविकांची उपस्थिती वाढत गेली असून, या अखेरच्या शनिवारी तर भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक उत्साहाने पाटील गल्ली परिसर दिवसभर गजबजलेला होता.