“भाड्यावरून वाद, रिक्षाचालक-प्रवासी महिलांमध्ये हाणामारी; दोघांचे आरोप-प्रत्यारोप”
बेळगाव :
शहरातील डॉ. आंबेडकर रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयासमोर आज दुपारी रिक्षाचालक आणि दोन महिला प्रवाशांमध्ये झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. किरकोळ भाड्याच्या कारणावरून उफाळलेला हा वाद पाहणाऱ्यांसाठी धक्कादायक ठरला.
गांधीनगरकडे जाण्यासाठी दोन महिला प्रवासी रिक्षामध्ये बसल्या. रिक्षाचालक मोहम्मद अन्वर मकानदार यांनी १५० रुपयांचे भाडे सांगितले. मात्र महिलांनी नेहमीप्रमाणे ७०-८० रुपयेच देऊ करण्याची तयारी दर्शवली. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वाद चिघळताच महिलांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप मकानदार यांनी केला आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून रिक्षाची काचही फोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जखमी चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे, प्रवाशांपैकी एक असलेल्या अल्मास यांनी उलट रिक्षाचालकावरच गंभीर आरोप केले. रिक्षाचालकाने भाड्यावरून वाद घालत आपल्याला मारहाण केली आणि जास्त पैसे मागितले, असा त्यांचा दावा आहे. शिवाय अशा गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून घेतले असून, परस्परविरोधी तक्रारींवर आधारित गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.