मातृभाषेच्या शाळा टिकवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव :
कणबर्गी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृशाळेच्या जपणुकीसाठी एक आदर्श उपक्रम राबवला आहे. सन 2000 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेत दाखल झालेल्या पहिलीच्या मुलामुलींना शालेय बॅग व पाण्याच्या बाटल्या भेट स्वरूपात प्रदान केल्या.
गावातील मातृभाषिक शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी गावोगावी लढा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कणबर्गीच्या विद्यार्थ्यांनी कोणताही विलंब न लावता, फक्त एका दिवसात साहित्य जमा करून थेट शाळेत पोचवले.
या उपक्रमात महेश सुळगे पाटील, बसवंत कडोलकर, अभिषेक मेंनसे, सुशांत मुचंडीकर, अनंत सुतार, सुधा लोहार, मनीषा गावडे या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. तसेच SDMC अध्यक्ष किसन सुंठकर, शिक्षक व शिक्षिका यांची उपस्थिती लाभली.
माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शाळेत शिकणाऱ्या बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. गावकऱ्यांनी या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले असून, मातृभाषेच्या शाळा टिकवण्यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेणे किती गरजेचे आहे, याचे उत्तम उदाहरण या कृतीतून दिसून आले.