बस्सापूर सरकारी प्राथमिक शाळेत ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
बस्सापूर (ता. बेळगाव) | १५ ऑगस्ट २०२५ रोजी बस्सापूर येथील सरकारी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. विद्यार्थी, शिक्षक आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज फडकवून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि भाषणांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. तरुणाईने देशाच्या प्रगतीत कशी भूमिका बजावावी यावरही भाषणे झाली.
शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन म्हणून ७ वीतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सुश्री राखी कुलकर्णी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देण्यात आले.
पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य श्री. विक्रम पाटील, श्री. नागप्पा बागेवाडी, श्री. चंबन्ना उल्लेगड्डी, श्री. जगदीश पुजारी, श्री. चंद्रू चाचडी व सिद्धन्ना बागेवाडी यांनी उदारतेने दान केले. त्यांच्या या योगदानाचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनासह झाला. यावेळी सर्वांनी एकतेचा संदेश देत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम करण्याची प्रतिज्ञा केली.