राष्ट्रीय समूहगीत व लोकगीत स्पर्धेत बेळगावच्या शाळांचा यशस्वी ठसा
भारत विकास परिषदेच्या वतीने रविवारी आयोजित राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. हिंदी विभागात लव्ह डेल सेंट्रल स्कूलने पहिला क्रमांक पटकावत रायचूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. विजेत्या संघाला आकर्षक चषक, रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
लोकगीत गटात ज्योती सेंट्रल स्कूलने पहिल्या स्थानावर नाव कोरले. हिंदी विभागातील दुसरा क्रमांक ज्योती सेंट्रल स्कूलकडे गेला, तर तिसरा क्रमांक भरतेश इंग्रजी माध्यम स्कूलने मिळविला. ज्ञान प्रबोधन मंदिर व अमृता विद्यालयम् यांना विशेष पारितोषिके मिळाली.
लोकगीत स्पर्धेत दुसरे स्थान एम. व्ही. हेरवाडकर स्कूलकडे गेले, तर तिसऱ्या स्थानी अमृता विद्यालयम राहिले. संत मीरा हायस्कूल आणि के. एल. एस. स्कूल यांना विशेष पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सोनाली सरनोबत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. वंदे मातरमने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागतपर भाषण केले, तर परीक्षक व स्पर्धेच्या नियमांची माहिती मान्यवरांनी दिली.
परीक्षक मंडळात मंजुश्री खोत, मैथिली आपटे व किर्ती सरदेसाई यांनी काम पाहिले. डॉ. सोनाली सरनोबत यांनी राष्ट्रभक्ती व सामाजिक जबाबदारीवर भाष्य केले. सायंकाळी महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत परिषदेच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखद देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन के. व्ही. प्रभू यांनी मानले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली. शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि अनेक मान्यवर या यशाचा साक्षीदार झाले.