हळियाळ तालुक्यात जय्या ऑर्गॅनिक तर्फे ६०० शेतकऱ्यांना नारळाच्या रोपांचे वाटप
कारवार – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसोबतच अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी बेंगळुरुस्थित जय्या ऑर्गॅनिक योजना संस्थेतर्फे हळियाळ तालुक्यातील गरडोळी येथे नारळ रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून तब्बल ६०० लाभार्थी शेतकऱ्यांना फायदा झाला.
याआधी यल्लापूर तालुक्यातील कन्नीगेरी व कोडसे गावांमधील शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींचे रोपे देण्यात आली होती. त्या वनस्पतींचे संगोपन व वापर याविषयी तज्ज्ञ प्रदीपकुमार हेगडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी औषधी वनस्पतींचा शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी व आरोग्य संवर्धनासाठी होणारा उपयोग स्पष्ट केला.
जिल्हा समन्वयक मायकेल कैतान सिद्दी यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेत, बागांमध्ये पूरक उत्पन्न मिळावे या उद्देशाने नारळ रोपे व औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले. यासोबत त्यांची देखभाल व फायदे याविषयी माहिती देऊन लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे.”
या कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी मल्लेश्वरी, क्षेत्र प्रशिक्षक शांतिसिद्दी, विद्यासिद्दी, मंनजनाथ सिद्दी, इब्राहिम जांगले, पूर्णिमा सिद्दी, मेरी गारिबाचे, बियाम नायक, फ्रान्सिस हंचिनमणी, गणेश सिद्दी, विनय पाळगोंड यांची उपस्थिती होती.
स्थानिक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, अशा उपयुक्त योजनांमुळे उत्पन्नवाढीबरोबरच शेतीत विविधता निर्माण होत असल्याचे सांगितले.