ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गायन स्पर्धेत उत्तुंग यश
बेळगाव – दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगीतकलेत आपले कौशल्य सिध्द करून शाळेचा गौरव वाढवला आहे. भारत विकास परिषद, बेळगाव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित गायन स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन महत्त्वपूर्ण पारितोषिके पटकावली.
या स्पर्धेत लोकगीत गायन प्रकारात ज्योती सेंट्रल शाळेच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवला, तर देशभक्ती गीत गायन प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. शालेय संगीत शिक्षिका श्रीमती अक्षता मोरे यांनी विद्यार्थ्यांना काटेकोर प्रशिक्षण व मार्गदर्शन दिल्यामुळे ही कामगिरी शक्य झाली.
या यशाबद्दल शाळेच्या एस.एम.सी. कमिटी तसेच मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या मेहनतीचा अभिमान व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ सुरेल गायनच नव्हे तर सादरीकरणातही उत्कृष्टता दाखवून इतर २२ शाळांमधून आपली छाप पाडली आहे.”
या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शाळेच्या सांस्कृतिक परंपरेत आणखी एक अभिमानास्पद पान जोडले गेले आहे.