आईच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आनंदाचे कुटुंबीयांचे ५० लाखांचे भूदान*
बेळगाव :
होनगा गावातील सर्वसाधारण कुटुंबातील रामभाऊ आनंदाचे यांच्या पत्नीचे २०२० साली निधन झाले. त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आनंदाचे कुटुंबीयांनी केलेल्या भूदानामुळे परिसरात आदर्श निर्माण झाला आहे.
रामभाऊ आनंदाचे व त्यांच्या मुलांनी पहिल्या स्मृतिदिनावेळी पाच वेगवेगळ्या प्रकारचे दान करण्याचा संकल्प केला होता – ज्ञानदान, अन्नदान, सुवर्णदान, गोदान आणि भूदान. या संकल्पातील भूदान नुकतेच पूर्ण झाले असून, त्यांनी होनगा गावात ७.२५ गुंटे (मूल्य अंदाजे ५० लाख रुपये) एवढी जमीन मंदिराला दान दिली आहे.
रामभाऊ आनंदाचे यांच्या पत्नीला २०१० मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. तब्बल दहा वर्षे आजाराशी लढा देत त्यांनी २०२० मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या स्मृतीस कायम ठेवण्यासाठी कुटुंबीयांनी विविध प्रकारची दाने करताना आई-वडिलांच्या आशीर्वादालाच जीवनातील यशाचे मूळ मानले आहे. आतापर्यंत चार प्रकारची दाने पूर्ण झाली असून, पुढील पाच-सहा महिन्यांत गोदानही करण्यात येणार आहे.
कीर्तन व सामूहिक पूजनाचे आयोजन
स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी होनगा येथील विठ्ठल मंदिरात सद्गुरू विठ्ठल दादा वासकर यांचे कीर्तन आयोजित केले आहे. त्याच दिवशी अंगारकी संकष्टीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आवारातील गणेश मंदिरात सामूहिक चंद्रोदय पूजन व गणेश पूजन होईल. भक्तांनी मोदक, नारळ नैवेद्य घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले असून, पूजनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.