**सीमाभागातील कन्नडसक्तीप्रश्नी खासदार श्रीकांत शिंदे सक्रिय, धैर्यशील माने यांच्याशी तातडीची चर्चा**
बेळगाव : सीमाभागातील कन्नडसक्ती आणि मराठी भाषिकांवरील अन्यायाचा विषय शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आला.
दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी ठाण्यातील आनंदवन आश्रमात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी खासदार शिंदे यांची भेट घेऊन बेळगावसह सीमाभागातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. कर्नाटक प्रशासनाकडून मराठी भाषिकांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर कन्नड सक्तीबाबतही त्यांनी त्यांचे लक्ष वेधले.
ही माहिती मिळताच खासदार डॉ. शिंदे यांनी तत्काळ तज्ञ समिती अध्यक्ष व खासदार धैर्यशील माने यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. चर्चेनंतर खासदार माने यांनी समाज माध्यमांवरून आपली भूमिका जाहीर केली तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रातील मुद्द्यांवरही आपटेकर यांच्याशी संवाद साधला.
सीमाभागातील मराठी भाषिकांवरील वाढत्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घडामोडींमुळे या प्रश्नाकडे पुन्हा एकदा राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.