बेळगावातील सरकारी कार्यालयांमध्ये लोकायुक्तांची धडक कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खळबळ
बेळगाव (प्रतिनिधी):
शहरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप सतत समोर येत असतानाच, लोकायुक्त विभागाने बेळगावात अचानक तपास मोहिमेचा धडका दिला आहे. या कारवाईमुळे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बुधवारी उपनिबंधक कार्यालयावर टाकलेल्या धाडीने या तपासणी मोहिमेला सुरुवात झाली. यानंतर, तालुका पंचायत कार्यालयात सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत विविध विभागांची कसून चौकशी करण्यात आली. त्याचवेळी बेळगाव महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्यालयात देखील तपासणी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय केली गेल्यामुळे संबंधित कार्यालयांमध्ये मोठी खळबळ माजली. अनेक ठिकाणी कागदपत्रांची बारकाईने छाननी करण्यात येत असून, व्यवहारातील अनियमितता शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शहरात सातत्याने भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असताना, लोकायुक्तांनी सुरू केलेल्या या तपासामुळे लपवले जाणारे अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता या तपासांनंतर कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते, कोण दोषी ठरतात, आणि पुढील कायदेशीर पावले कोणती उचलली जातात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.