बेळगाव (प्रतिनिधी ) :अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर बेळगाव सभागृहात ६वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध लेखक आणि ‘पानिपत’कार विश्वास पाटील भूषवणार आहेत.
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांच्या ‘पानिपत’ या ऐतिहासिक कादंबरीने मराठी वाचकांना इतिहासाची नव्याने ओळख करून दिली. तसेच, ‘संभाजी’, ‘झाडाझडती’, ‘क्रांतीसूर्य’, ‘पांगिरा’, ‘महानायक आंबी’ आणि ‘चंद्रमुखी’ या त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेत निवृत्त अधिकारी आहेत.
संमेलन तीन सत्रांमध्ये होणार असून, प्रबोधनात्मक व्याख्यान आणि लोकसंस्कृतीचा जागर या सत्रांचा समावेश असेल.परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांचा मार्गदर्शनाखाली होत असून या संमेलनामुळे साहित्य रसिकांना विशेष आकर्षण ठरणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी परिषदचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, जिल्हा अध्यक्षा अरुणा गोजे-पाटील, कार्याध्यक्ष महादेव चौगुले, शिवसंत संजय मोरे, संजय गुरव, रणजीत चौगुले, मोहन आष्टेकर, एम. के. पाटील, सुरज कणबरकर, संजिवनी खंडागळे, नेत्रा मेणसे आणि गीता घाडी उपस्थित होते.