बोरवेलचे दूषित पाणी पिऊन आजारी पडल्याने एकाच दिवशी ४१ रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील चचडी गावात घडली. बोरवेलचें पाणी ओव्हर हेड टॅन्कमध्ये चढवून नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जातो.पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपमध्ये गटारीचे पाणी मिसळल्याने पाणी दूषित झाले आहे.एक रुग्ण अत्यवस्थ असून त्याला बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या एक आठवड्यापासून चचडी गावातील लोकांना जुलाबाचा त्रास होत आहे.पण मंगळवारी मात्र एकाच दिवशी ४१ जणांना जुलाबाचा त्रास होऊन आजारी पडले.त्यापैकी तीन जणांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात,तीन जणांना बैलहोंगल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अन्य रुग्णांवर चचडी आणि इंचल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी रुग्णांची भेट घेऊन उपचाराच्या संदर्भात सूचना केल्या आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन चचडी गावात चार डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तळ ठोकून आहेत. दूषित पाण्यामुळे जुलाबाचा त्रास ग्रामस्थांना सुरू झाला आहे गावात सध्या टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.पाणी उकळून पिण्याची सूचना ग्रामस्थांना करण्यात आली आहे.बोरवेलच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश कोणी यांनी दिली.