मतदार याद्या मराठीत पुरवा, युवा समितीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार
अलीकडेच बेळगावच्या प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, सदर यादी फक्त कन्नड भाषेत प्रसिद्ध केल्याने मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सन २००८ साली विविध राज्यातील अल्पसंख्याक भाषिकांना त्यांच्या भाषेत सुविधा पुरविण्यासाठी मतदारसंघनिहाय अभ्यास करून केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी दिनांक १६/०९/२००८ रोजी सर्व राज्यांच्या आयुक्तांना आपल्या राज्यात जे भाषिक अल्पसंख्याक नागरिक आहेत त्यांना निवडणूक संदर्भात देण्यात येणारी सर्व कागदपत्रे त्यांच्या भाषेत पुरविण्यासाठी सक्त आदेश दिले होते, तरी देखील बेळगावचे प्रशासन जाणूनबुजून मराठीला डावलत असल्याने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बेळगावच्या प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मतदार याद्या, मतदार नोंदणी अर्ज, उमेदवारी अर्ज इतर भांषासोबत मराठीत पुरविण्यासाठी निर्देश बेळगावच्या प्रशासनाला करावी अशी केंद्रीय निवडणूक आयोगा कडे मागणी म. ए. युवा समितीने केली आहे.